Ad will apear here
Next
संघबांधणी कशी करावी?
‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेत आपण आतापर्यंत ग्लोबलायझेशन, नेतृत्वगुण आदींसंदर्भात समर्थांनी दासबोधात लिहून ठेवलेल्या विचारांबद्दल चिंतन केले. संघबांधणी (टीम बिल्डिंग) कशी करावी, या संदर्भात समर्थांचे विचार काय होते, हे आजच्या भागात पाहू या.
...........
समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे -

बहुत लोक मिळवावे। एक विचारे भरावे।
समुदाय असावा मोठा। परि तणाव असाव्या बळकट।।

संघटनेत खूप माणसे हवीत. परंतु ती एका ध्येयाने/ विचाराने भारलेली असली पाहिजेत, प्रेरित असली पाहिजेत. त्याच वेळेला नुसता समुदाय मोठा असून किंवा संघटनेत खूप लोक असून चालणार नाहीत, तर यांचे नेटवर्किंग उत्तम व बळकट असणे आवश्यक आहे, असेही ते सांगतात. संघटनेत लायक लोक शोधून काढून, निवडून नेमावेत व त्यांच्या योग्यतेचे काम त्यांना द्यावे. तसेच त्यांना मोबदला (कॉम्पेन्सेशन) व वागणूकही त्यांच्या योग्यतेची द्यावी (फ्लेक्सी पे कन्सेप्ट) असेही त्यांनी सांगितले आहे. यासंबंधीची ही ओवी -

बळकट लोक निवडावे। काम पाहोनि लावावे।
सगट मुशारे करावे। हे मूर्खपण।।

‘सगट मुशारे करावे’ म्हणजे ‘सब घोडे बाराटके’ असे धोरण हा मूर्खपणा आहे. योग्यता व लायकीनुसार अधिकार व पगार द्यावा, असेही ते सुचवितात.

लोक बहुत शोधावे। त्यांचे अधिकार जाणावे।
जाणजाणोन धरावे। जवळ दूरी।।

या ओवीतही समर्थ, ‘योग्य निवड करून (हेडहंटिंग) चांगल्या, लायक व्यक्ती शोधून, त्यांच्या योग्यतेनुसार संघटनेत त्यांना स्थान द्यावे,’ असेच सांगतात.

कार्यकर्त्यास गमू देऊ नये। काम घेता त्रासू नये।
कठीण शब्द बोलू नये। क्षणोक्षणी।।

काम करणाऱ्याला (कार्यकर्ता/कर्मचारी) इकडे तिकडे वेळ घालवू देऊ नये. ‘टाइमपास’ करू देऊ नये (गमू देऊ नये) हे सांगतानाच, काम करून घेणारे सुपरव्हायझर/मॅनेजर यांचे कामच इतरांकडून काम करून घेण्याचे असल्याने ते काम करून घेता किचकिच करू नये, त्रासू नये आणि सारखे घालून पाडून बोलल्याने काम करणारा ‘डिमोटिव्हेट’ होतो, असे समर्थ सुचवितात. ‘डेलिगेशन’  किंवा ‘एम्पॉवरमेंट’ म्हणजेच लोकांकडे काम सोपवून ते करून कसे घ्यावे, यासंबंधी समर्थ सांगतात -

अधिकार पाहोन कार्य सांगणे।
सापेक्ष (सावधपणा/ जबाबदारीची जाणीव) पाहोन विश्वास धरणे।
आपका मगज (महत्त्व) राखणे। काहीतरी।।

क्षमता (अॅबिलिटी) बघून व जबाबदारीची जाणीव पाहूनच काम विश्वासाने सोपवणे. शिवाय काहीतरी शेंडी आपल्या हातात ठेवावी (आपला मगज राखणे), असेही ते सांगतात. म्हणजेच ‘डेलिगेशन’ केल्यानंतरही आपले त्या कामावर काहीतरी नियंत्रण हवे, असे ते धूर्तपणे सांगतात.

टीमवर्क (संघकार्य) कसे करावे आणि ते करताना दृष्टिकोन कसा हवा हे खालील ओव्यात समर्थ सांगतात -

आडले जाकसले जाणावे। यथाणूशक्ती कामास यावे।
मृदवचने बोलत जावे। कोणी येकासी।।

वागताना ‘प्रो-अॅक्टिव्हनेस’ असावा, असे ते सुचवितात. कोणाला काय अडचण आहे, मदत हवी हे ‘टीम मेंबर’ने स्वतःहून पाहून, पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे. परंतु त्याच वेळी मदत केल्याचा अहंकार न दाखवता ‘मृदवचनाने’ म्हणजे गोड भाषेतच बोलावे, असे सांगायलाही ते विसरत नाहीत. समर्थांच्या प्रत्येक वचनात किती खोल व मार्मिक अर्थ दडलेला असतो, तो या इतर सर्वच ओव्यांत पहायला मिळतो. 

टीममध्ये काम करताना एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी व्हायला पाहिजे व दुरावलेल्यांनासुद्धा चांगले बोलून पुन्हा संघात सामील करून घ्यायला हवे, असे ते पुढील ओवीत सांगतात.

दुसऱ्याचे दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।
प्राणिमात्रास मेळवून घ्यावे। बऱ्या शब्दे।।

‘माझे-तुझे’ असे करत न बसता आपल्या संस्थेचे/कंपनीचे काम आहे, अशी भावना जागृत ठेवून संघभावनेने काम करणेच योग्य, असे सांगताना ते म्हणतात - 

आपले अथवा परावे। कार्य अवघेच करावे।
प्रसंगी (Exigencyच्या वेळी) कामास चुकवावें।
हे विहित (योग्य) नव्हे।।

यापेक्षा आधुनिक विचार काय असू शकतात? आजच्या आधुनिक व औद्योगिक जगात ‘मॉडर्न मॅनेजमेंट’च्या संकल्पनांमध्ये हीच नव्हे, तर समर्थांच्या अनेक/शेकडो ओव्या चपखल व नेमक्या लागू पडतात. हे सारे त्यांनी ३५०हून अधिक वर्षांपूर्वी लिहिले, हे लक्षात घेतले तर त्यांना ‘समर्थ’ म्हणजे मोठा नेता/नेत्यांचा नेता ही पदवी का मिळाली, हे लक्षात येते. ‘विन-विन सिच्युएशन’ व्हावी व ‘नाही रे’ वर्गाला ‘आहे रे’ वर्गाने साह्य करून समाजात वर आणले पाहिजे, अशी समर्थ रामदासांची व्यापक दृष्टी होती. ती पुढील ओवीत दिसते.

बहुतांचे अन्याय क्षमावे। बहुतांचे कार्यभाग करावे।
आपल्यापरिस व्हावे पारखे जन।।

‘पारखे जन’ म्हणजे समाजातले मागासलेले लोक पुढारलेल्या समाजाच्या तोडीला/बरोबरीला येण्यासाठी, पुढारलेल्या समाजाने मदत केली पाहिजे, असे सांगणारा हा न्याय्य, दूरदृष्टीचा व बहुजन समाजाचे हित पाहणारा नेता होता, असे स्पष्ट पाहायला मिळते. 

श्रीनिवास रायरीकर
- श्रीनिवास रायरीकर

(लेखक ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक आहेत. ते दासबोधाचे अभ्यासक असून, ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ या विषयावर ते कार्यशाळा घेतात.)

(दासबोध बुकगंगा डॉट कॉमवरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZTACJ
Similar Posts
आधी केले, मग सांगितले... दासबोधातील व्यवस्थापन व नेतृत्वविषयक संकल्पनांबद्दलची प्राथमिक माहिती आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या पहिल्या भागात घेतली. या भागात आपण समर्थ रामदास यांच्या चरित्राचे महत्त्वाचे टप्पे आणि दासबोध या ग्रंथाच्या रचनेचा थोडक्यात परिचय करून घेऊ. ‘आधी केले व मग सांगितले’ असे त्यांनीच लिहून ठेवले
माणूस अपयशी का होतो? समर्थ रामदास स्वामींनी दासबोधातून सांगितलेली व्यवस्थापनाची, नेतृत्वगुणविषयक, तसेच व्यक्तिविकासाची काही सूत्रे आपण ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेतून पाहिली. माणूस अपयशी का होतो याची समर्थांनी केलेली कारणमीमांसा आणि अपयश टाळण्यासाठी सांगितलेली सूत्रे, कार्यसंस्कृती आणि व्यक्तिविकासाबद्दल केलेले भाष्य
समर्थांचा नेतृत्व आराखडा प्रत्येक गोष्ट कष्टाने, प्रयत्नाने साध्य होणारी आहे. जगात अशक्य असे काही नाही. नशिबाने नव्हे तर ‘कष्टाने, ज्ञानाने, प्रयत्नाने व अचूक प्रयत्नाने माणूस यशस्वी व मोठा होतो,’ असा समर्थांचा संदेश आहे. नेतृत्वगुणाबद्दलची तत्त्वे समर्थांनी ३५० वर्षांपूर्वीच दासबोधामध्ये सांगून ठेवली आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू -
‘ग्लोबलायझेशन’संदर्भात दासबोध काय सांगतो? जागतिकीकरण अर्थात ग्लोबलायझेशन या शब्दाचा अनुभव आपण आजच्या जगात अगदी दररोज घेत आहोत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलेले काही विचार या ग्लोबलायझेशनच्याही युगात लागू पडतील, असे आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेच्या आजच्या भागात आपण त्याबद्दलच माहिती घेऊ या...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language